सहकारी सूतगिरणीत खोटे सभासद दाखवून 31 लाख 50 हजारांचा अपहार केल्याच्या आरोपावरून जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी विरगोंडा पाटील (रा.महागाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आणखी 17 आरोपी असून यामध्ये माजी नगरसेवक राम दादोबा उर्फ आर. डी. पाटील (खरी कॉर्नर) यांचाही समावेश आहे. याबाबतची फिर्याद सर्जेराव भोसले यांनी दिली असून शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आरोपींनी सहकारी सूतगिरणीला मिळालेल्या शासकीय कर्ज रकमेची उधळपट्टी केली. खोटे कागदोपत्री खर्च दाखवून शासकीय रकमेचा अपहार केला. खोट्या व बनावट नोंदी मार्फत खर्च दाखवून रक्कम संगणमताने हडप केली. संस्थेमध्ये बोगस आणि बनावट १५०० सभासद दाखवून कायदेशीर असणाऱ्या २२०० सभासदांची नावे गहाळ केली आहेत. सभासदांच्या शेअर्सची रक्कम प्रवेश फी अशी एकूण ३१ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केला आहे, असे आरोप फिर्यादीने केले आहेत. या अपहारात संस्थेचे अध्यक्ष माजी आजी सचिव आणि संचालकांचा सहभाग आहे.
संशयित आरोपींमध्ये अनिल कवाळे (कासारवाडी), अनिल म्हापसेकर (अयोध्या पार्क), अशोक मोरे (कासारवाडी), विजय वाघ (रुईकर कॉलनी), सर्जेराव कांबळे (नवे पारगाव) रंगराव बोराटे (जाखले), जॉन महापुरे (कोडोली), रंजना सावंत (जयसिंगपूर) मधुकर राऊत, रमेश पांढरे (राजारामपुरी) अजित आवळे (शिंगणापूर), राजाराम सातपुते (कसबा बीड), सुजाता तांबेरी (शाहूपुरी), कुंदन भिसे (शाहू मिल जवळ), पी. दैव (विश्वकर्मा कॉम्प्लेक्स लक्ष्मीपुरी), कृष्णा जोशी (तळसंदे) यांचा समावेश आहे.