अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘राम सेतु’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तिथपासून चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. आता अखेरीस ‘राम सेतु’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच काही मिनिटांमध्येच त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील अक्षयचा नवा लूक व भूमिका पाहता प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित कधी होणार? याची वाट पाहत आहेत.
चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवाद विशेष लक्षवेधी आहेत. त्याचबरोबरीने चित्रीकरणासाठी निवडण्यात आलेले लोकेशनही कमालीचे आहेत. ट्रेलर पाहता चित्रपटासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या ट्रेलरमधील जबरदस्त अॅक्शन सीन्स विशेष लक्षवेधी आहेत.
चित्रपटाची कथा ही एका आर्कियोलॉजिस्टवर आधारित आहे. ‘राम सेतु’ खरंच अस्तित्वात होतं का? की ही निव्वळ काल्पनिक कथा आहे याचा शोध घेण्यासाठी अक्षयची निवड करण्यात येते. भारत-श्रीलंकाच्यामध्ये असलेल्या राम सेतुभोवती या चित्रपटाची कथा फिरते. चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी मनोरंजनाच्या दृष्टीने प्रेक्षकांना काहीतरी नवं पाहायला मिळणार आहे.