राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी, काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावरुन लक्ष्य केलं. पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याच्या हट्टापायी तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या झेंड्याखाली राष्ट्रवादीचा अजेंडा राबवला जात असल्याची टीका केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “याला काही अर्थ नाही. तुम्ही मंत्रीमंडळात होता ना, ते माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे. तेव्हा मी कधीच झेंडा शिवसेनेचा आहे, पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे असं ऐकलं नाही
आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. १९९९ लादेखील आम्ही आघाडी केली होती. २००४, २००९ आणि आता २०२१ मध्येही केली होती. अडीच वर्षात जे काही निर्णय घेण्यात आले ते सर्वांनी मिळून घेतले होते. त्यांची काही वक्तव्यं राजकीय स्वरुपाची होती. त्याला फार काही महत्त्व द्यावं असं वाटत नाही,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.