अनैतिक संबंध असलेल्या विधवेने लग्नास नकार दिल्याने तिचा खून करण्याचा प्रकार कसबा बावडा उपनगरात रविवारी घडला. मयत कविता प्रमोद जाधव (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. खून करून पळून जाणाऱ्या राकेश श्यामराव संकपाळ (वय ३०) या संशयित आरोपीला पोलिसांनी पकडले.
राकेश संकपाळ हा कसबा बावडा येथील शहाजी नगर लाईन बाजार येथे राहतो. मयत कविता जाधव (रा. कसबे तारळे, राधानगरी) ही त्याच्या नात्यातील आहे. तिच्या पतीचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ती शिवणकाम करून उदरनिर्वाह करत होती. राकेशने तिच्याशी संपर्क वाढवला होता. दोघांचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते.
राकेशने कविता हिला लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. तीन मुले असल्याने कविता त्यास नकार देत होती. आज राकेशने घरी आई-वडील नसताना कविता हिला बोलावून पुन्हा लग्नाचा विषय काढला. तिने नकार दिल्यावर चिडलेल्या राकेशने चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. तो पळून जात असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले व पथकाने पकडल्यावर त्याने खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.