भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अध्यक्षपदी सौरव गांगुलीच्या जागी १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे. रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. १८ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडणार आहे.
बीसीसीआयने सौरव गांगुलीची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष असतील. सचिव जय शहा त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये अध्यक्ष बनलेल्या गांगुलीची इच्छा होती की, त्यांनी आणखी एकदा संधी मिळावी. पण, हे होऊ शकले नाही. त्याला संचालक मंडळाच्या बैठकीत विरोध करण्यात आला. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
सौरभ गांगुलीच्या अध्यक्षदावरून पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सौरभ गांगुलीने भाजपाला नाही म्हणण्याची किंमत भोगावी लागत आहे, असा आरोपही या पक्षांकडून होत आहे.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई झाली. या निवडणुकीपूर्वी भाजपाने तृणमूल काँग्रेसविरुद्ध गांगुलीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उतरवण्यास तयारी केली होती. मात्र, गांगुलीने राजकारणात पाऊल ठेवलेच नाही.त्यात आता गांगुलीच्या जागेवर रॉजर बिन्नींचे नाव समोर आल्याने तृणमूल काँग्रेसने भाजपा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, बीसीसीआय जय शाहांना सचिवपदावर कायम ठेऊ शकते. मात्र, गांगुलीची उचलबांगडी करण्यात येते, अशी टीका कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी ) आणि काँग्रसने भाजपावर केली आहे.
याप्रकरणावर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “भाजपात प्रवेश करण्याबाबत सौरव गांगुलीशी चर्चा करण्यात आली होती. पण, गांगुलीने त्यास नकार दिला. २०२१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर भाजपाने गांगुलीच्या नावाचा वापर केला. मग, गांगुलीला दुसऱ्यांदा बीसीसीआयचा अध्यक्ष का? बनवलं जात नाही. भाजपा सौरव गांगुलींचा अपमान करत आहे,” असा आरोपही घोष यांनी केला.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत गांगुलीला भाजपा आणि तृणमूल कडून पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रचंड राजकीय दबाव होता. त्यामुळे गांगुलीने राजकारणापासून चार हात दूरच राहण्याच्या निर्णय घेतला. पण, विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभवाचा सामना करावा लागल्याने गांगुली तृणमूल काँग्रेसच्या जवळ गेल्याचं सांगितले जाते.