शिंदेच अपात्र ठरले तर…”; निवडणूक आयोगाच्या नाव, चिन्हं गोठवण्याच्या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होणार?

KolhapurLive

आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं. न्यायालयाने शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविल्यास चिन्ह गोठविल्याची जबाबदारी कोणाची?’’ असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुकवरुन संवाद साधताना केलेल्या या विधानामुळे निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षचिन्ह आणि नाव गोठवण्याचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होणार का यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात मत व्यक्त करताना कायदेशीर बाबींचा उलगडा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीवर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हं गोठवण्याचा जो निर्णय दिला आहे त्याचा परिणाम होणार का? असा प्रश्न बापट यांना ‘टीव्ही ९ मराठी’वरील मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना बापट यांनी स्पष्टपणे थेट याचा परिणाम होणार नसला तरी घटनाक्रम पाहता ज्या पद्धतीने सर्व काही घडलं ते पाहता पहिले १६ आमदार अपात्र ठरले पाहिजेत असं मत मांडलं.