आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याला यश....
झोपडपट्टी धारकांच्या 40 वर्षापासूनच्या समस्या निघणार निकालात....
कोल्हापूर, दि: ४: गडहिंग्लज शहरात ४० वर्षांपूर्वी वसलेल्या दुंडगा मार्ग, मेटाचा मार्ग आणि धबधबा मार्ग या तीन मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. परंतु; आजअखेर त्यांचे नियमितीकरण झालेले नाही. या झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणाचे स्वप्न साकार होत आले आहे. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याला यश आल्यामुळे ४० वर्षापासूनच्या झोपडपट्टीवासियांच्या समस्या निकालात निघणार आहेत.
या झोपड्या नियमित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी या बैठकीला उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी, या झोपड्या नियमित होण्यासाठी सर्वप्रथम नगर भूमापन विभागाकडून या झोपड्यांची मोजणी होणे गरजेचे होते. त्यासाठी अव्वाच्या सव्वा फी सांगितली जात होती. आजच्या बैठकीत दहा लाख रुपये फी निश्चित करून ती गडहिंग्लज नगरपालिकेला भरण्याच्या सूचना आमदार श्री मुश्रीफ यांनी दिल्या. त्यामुळे झोपड्यांच्या जागेची मोजणी होणार आहे. मोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच, या झोपडपट्ट्यांमधून ३० मीटरचा प्रस्तावित रस्ता आहे. तो सहा मीटर करावा, अशी झोपडपट्टी धारकांची मागणी होती. परंतु; जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांनी हा रस्ता किमान नऊ मीटरचा असावाच लागेल, असे सांगितले. त्याबद्दलही झोपडपट्टीवासियांनी संमती दर्शवली.
यावेळी आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहरातील इराणी वसाहत, बारा प्लॉट, अण्णाभाऊ साठेनगर, वडरगे रोड, आझाद रोड, शेंद्री रस्ता या झोपडपट्ट्यांच्या नियमितिकरणासाठीही प्रयत्नशील आहे.
"स्थलांतर शक्यच नाही........"
प्रस्तावित ३० मीटरच्या रस्त्यामुळे झोपडपट्टीधारकांचे नवीन दुसऱ्या जागेत स्थलांतर करावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिला. त्यावर आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर शक्यच नाही. झोपडपट्टीधारकांचे नेते सिद्धार्थ बन्ने म्हणाले, गेल्या ४० वर्षापासून झोपडपट्टी धारकांच्या भावना त्या जागी एकरूप झालेल्या आहेत. त्यामुळे रस्त्याचीच रुंदी कमी करून, आहे त्या झोपडपट्टीतच झोपडपट्टीधारकांचे नियमितीकरण व्हावे, अशी आमची विनंती आहे.
यावेळी प्रा. सिद्धार्थ बन्ने, हारूण सय्यद, रश्मीराज देसाई, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, सुरेश म्हेत्री, इकबाल सनदी, महादेव जोशीलकर, महंमदअली पठाण, यासीन नाईकवाडे, पुनम म्हेत्री, माधवी जाधव, अमर म्हेत्री आदी प्रमुख उपस्थित होते.
......................
कोल्हापूर : गडहिंग्लज शहरातील झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार हसनसाहेब मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व इतर प्रमुख.
=========================