जळालेल्या अवस्थेत प्रवासी सैरभैर पळत होते, अनेकांचा तर रस्त्यावरच कोळसा झाला; आम्ही हतबल होतो, कारण…”

KolhapurLive

नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेबद्दल राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. तर या भयानक दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शीनी त्यांचा दाहक अनुभव सांगितला आहे.
यवतमाळकडून आलेली प्रवासी बस आणि अमृतधामकडून येणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला. बस इंजिन फुटलं होतं आणि डिझेलने पेट घेतला होता. पूर्ण बस जळू लागली, मागील बाजूने लोक आपला जीव वाचवण्यासाठी उतरत होते. पेटलेल्या अवस्थेत मिळेल त्या दिशेने सैरभैर पळत होते. रस्त्यावर काहीजणांचा पूर्णपणे कोळसा झाला.” असं प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

तर “अवघ्या एक किलोमीटरवर अग्निशमन विभागाचे कार्यालय आहे, परंतु अग्निशमन दल वेळेत पोहचलं नाही. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नंतर तातडीने सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी आले आणि कामाला लागले. सर्वजण सैरभैर पळत होते बस जळत होती, परंतु आगीच्या दाहकतेमुळे केवळ बघण्याशिवाय कोणीच काही करू शकत नव्हतं. जवळपास ४० जण बसमध्ये होते, त्यापैकी काहीजण सुस्थितीत बाहेर पडले, परंतु नंतर मात्र सर्व जळालेल्या अवस्थेत दिसत होते.” असंही ते म्हणाले.