सैफ अली खानचा ‘रावण’ पाहून प्रेक्षकांचा राग अनावर, कुणी तैमूरशी तर कुणी खिलजीशी केली तुलना

KolhapurLive



प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत म्हणजेच अयोध्या येथे प्रभास आणि क्रीती सनोन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित झाल्यावर लगेच याविषयी चर्चा सुरू झाली. सोशल मिडियावर या चित्रपटाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्स या बाबतीत नेटकऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

चित्रपटातील व्हीएफएक्स हे कार्टून फिल्मसारखे वाटत असून काही दृश्यं इतर चित्रपटांमधून चोरल्याचे आरोपही प्रेक्षकांनी लावले आहेत. या सगळ्यात प्रभासचा प्रभू श्रीराम म्हणून सादर केलेला लूक आणि सैफ अली खानचा ‘रावण’लूक यावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच टीका होताना दिसत आहे. या दोनही पात्रांनी दाढी मिशी ठेवल्याने बऱ्याच प्रेक्षकांनी यावर टीका केली आहे.

सैफचा या दाढीमधला लूक पाहून लोकांनी सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही लोकांनी सैफ हा तैमूरसारखा दिसत आहे असं म्हणत खिल्ली उडवली आहे. तर काहींनी रावणाची दाढी पाहून खिलजीची आठवण काढली आहे. टीझरमध्ये दिसणारा सैफ हा रावण नव्हे तर एक इस्लामी आक्रमणकर्ता किंवा मुघल शासक वाटत असल्याचंही प्रेक्षक म्हंटलं आहे. फक्त दाढी मिशीच नव्हे तर सैफच्या हेयरकटवरुनही लोकांनी टीका केली आहे. रावणाचं नाव बदलून रिज्वान ठेवणार का? असा खोचक प्रश्नही काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. ज्या रावणाला शिवभक्त म्हणून ओळखलं जातं त्याला या अशा मुघल शासकाच्या रूपात पाहून प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत.