मुंबईचा भूशास्त्रीय वारसा!

KolhapurLive

 

मुंबईनगरीच्या जन्माची कथा तिच्या इतिहासाइतकीच नाट्यपूर्ण आहे. त्या जन्मखुणा आजही ही मायानगरी आपल्या अंगावर मिरवते आहे आणि हाच आहे मुंबईचा भूशास्त्रीय वारसा.




डॉ. प्राची चौधरी

मुंबईनगरीच्या जन्माची कथा तिच्या इतिहासाइतकीच नाट्यपूर्ण आहे. त्या जन्मखुणा आजही ही मायानगरी आपल्या अंगावर मिरवते आहे आणि हाच आहे मुंबईचा भूशास्त्रीय वारसा.

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अगदी हिमालयाच्या जन्मापूर्वीची! भूशास्त्रीय कालगणनेतील क्रिटेशस युगाच्या अंतकाळी, म्हणजेच साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड आफ्रिकेजवळ म्हणजे आताच्या हिंदीमहासागरात होता. हा भूभाग हळूहळू ईशान्येला सरकत होता. याच काळात काही भूगर्भीय हालचालींमुळे ज्वालामुखींचे उद्रेक होऊ लागले. साधारण तीसेक हजार वर्षे हा अग्निकल्लोळ सुरू होता. लाव्हा विविधरूपांनी अवतरत होता. यातूनच दख्खनच्या पठाराचा आणि मुंबईचा जन्म झाला.

अग्निजन्य खडकाची विविध रूपे आजही मुंबई परिसरात पाहायला मिळतात. यापैकीच एक भूशास्त्रीय आश्चर्य म्हणजे, अंधेरी येथील 'गीलबर्ट हील'. या टेकडीची उंची साधारण २०० फूट आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, ही टेकडी अग्निजन्य बेसाल्टच्या स्तंभांनी बनलेली आहे. संपूर्ण जगात अशाप्रकारची बेसाल्ट स्तंभांची रचना अगदी मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळते. म्हणूनच १९५२मध्ये या टेकडीला राष्ट्रीय वारशाचा दर्जा देण्यात आला.