मोठ्या मूर्तींसाठी धावाधाव ;कमी दिवसांत मोठी गणेशमूर्ती घडविण्यात अडचण

KolhapurLive

 

राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची बाब म्हण

जे उंचीबाबतची अट शिथिल केली आहे.




मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई

राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उंचीबाबतची अट शिथिल केली आहे. पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी असलेली, चार फुटांची मर्यादा काढून टाकली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना आता चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार आहे. मात्र ही सवलत उत्सव सुरू होण्यास अवघा एक महिना उरलेला असताना देण्यात आली. त्यामुळे सर्वच गणेश मूर्तिकारांकडे मोठ्या मूर्ती उपलब्ध नाहीत. काही मूर्तिकारांनी आता मोठ्या गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केली असली तरी एका महिन्यात मोठ्या मूर्ती साकारणे अवघड असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सव सुरू होण्यास आता केवळ एक महिना उरला आहे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांचे लक्ष आता उत्सवाच्या तयारीकडे लागले आहे. उत्सव साजरा करताना सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम म्हणजे मूर्तीची निवड. एकदा का मूर्तीची निवड झाली की गणेशभक्त अन्य कामे करण्यासाठी मोकळे होतात. करोनाकाळ असल्याने मागील दोन वर्षांत गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा लावण्यात आल्या होत्या. त्यानुसार घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट तर सार्वजनिक उत्सव मंडळाची मूर्ती चार फुटांचीच असावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांत आणि या तिसऱ्या वर्षातही मोठ्या गणेशमूर्ती साकारण्यात आल्या नाहीत. मात्र यंदा उंचीवरील निर्बंधाच्या अटी शिथिल झाल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती कारखान्यामध्ये मोठ्या मूर्तींची मागणी सुरू केली आहे. मात्र अनेक चित्रशाळांमध्ये त्यांना नकारच मिळत आहे. बहुतेक सर्वच गणेश चित्रशाळांमध्ये मोठ्या मूर्तीच नाहीत. त्यामुळे मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या मूर्तीसाठी शहरभर फिरत आहेत. मात्र मोठ्या मूर्ती मिळत नसल्याने त्यांना लहान मूर्तीवरच समाधान मानावे लागत आहे. मोठ्या मूर्तीला परवानगी मिळाल्यानंतर काही तुरळक चित्रशाळांमध्ये मोठ्या मूर्ती साकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्यांचीही उंची सहा किंवा सात फुटांच्या वर नाही. हातात अवघा एकच महिना शिल्लक राहिल्याने इतक्या कमी वेळात मोठ्या मूर्ती साकारणे शक्य नसल्याचेच मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

मोठ्या मूर्तीना परवानगी दिल्यावर सर्व गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते दहा फुटांची आणि त्यापेक्षाही मोठी गणेशमूर्तीची मागणी करत आहेत. मात्र एका महिन्यात मोठ्या मूर्ती साकारणे शक्य नाही. त्यातही आता सहा किंवा सात फुटांच्या मूर्ती साकारण्यास आम्ही सुरुवात केली आहे. मात्र वेळेअभावी त्याही मूर्ती पाच किंवा सहापेक्षा जास्त आम्ही साकारू शकणार नाही.

- हरेश पाटील, मूर्तिकार, कोपरखैरणे

दरवर्षी आम्ही दहा फुटांची किंवा त्याही पेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. मात्र या वर्षी आम्हाला मोठी मूर्ती मिळत नाही. मूर्ती कारखान्यांमध्येही मोठ्या गणेश मूर्ती उपलब्ध नाहीत. त्यामुळे यावर्षी मोठ्या मूर्तीची परवानगी मिळाली असली तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही.

- महेंद्र पाटील, बाळ गणेश मित्र मंडळ,