शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कौशल्यपूर्ण कोर्सचा दीक्षांत समारंभ संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : इंटेलेक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे (आय. आय.ई.आर.) या संस्थेच्या सामंजस्य करारातून येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना 'क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट', 'फार्माकोविजीलन्स मॅनेजमेंट' 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स मॅनेजमेंट', 'रेग्युलेटरी अफेअर्स मॅनेजमेंट' हे कोर्स विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. बी. फार्मसीच्या अंतीम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी शिक्षणाबरोबरच त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी या उद्देशाने शिकविण्यात आलेल्या या चार कोर्सचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून कराडच्या कृष्णा विश्वविद्यापीठाचे डीन डॉ.एन. आर. जाधव उपस्थित होते. आय.आय.ई.आर.चे संस्थापक डॉ. महेश जाधव आणि अॅस्टर अॅनालिटिकल रिसर्च सेंटर पुणेचे संस्थापक डॉ. अमित कसबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.शिवराज सडेकर यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी प्रास्ताविकातून कोर्ससंबंधी सविस्तर माहिती दिली व अशा कोर्सच्या माध्यमातून फार्मा इंडस्ट्री व शिक्षण प्रणालीमध्ये पोकळी भरून निघण्यास मदत होईल असे स्पष्ट केले.

प्रमुख अतिथी कराडच्या कृष्णा विश्वविद्यापीठाचे डीन डॉ. एन. आर. जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात आज फार्मा हे क्षेत्र मोठ्या गतीने पुढे सरसावत आहे नवनवीन बदल स्वीकारून पुढे जात आहे. आय.आय.ई.आर.यांच्या वतीने राबविण्यात आलेले हे कोर्स विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाचे आहेत. यातून फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या खऱ्या करिअरला सक्षमता प्राप्त होणार आहे. या कोर्समध्ये आर्टीफिशेल इंटेलिजीन्सचा रोल महत्वाचा असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात अपडेट राहावे म्हणून अशा कोर्सना सद्या फार महत्व आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये फार्मसी हे सेवाभावी कार्याचे क्षेत्र आहे. आरोग्याचे वरदान या कार्यातून देता येणे शक्य आहे. त्यामुळे फार्मसीचे विद्यार्थी खऱ्या अर्थान भाग्यवान आहेत. त्यांना आपल्या करिअरमध्ये सेवा आणि कार्याची संधी मिळत आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि संशोधनाचा लाभ समाजाला व्हावा या उद्दात हेतूने शिवराज विद्या संकुलाने फार्मसी कॉलेजची उभारणी केली आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कु. श्रावणी कुंभार, कु. वैष्णवी पाडले, शिवराज बिराजदार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या दीक्षांत समारंभास फार्मसीचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा. बाहुबली उपाध्ये यांनी मानले.