राज्याला मान्सूनचे वेध लागले आहे. पण अचानक अवकाळी पावसाचे संकट पुढ्यात येऊन उभे ठाकले आहे. काल राज्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडला. मुंबईसह राज्यातील काही भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल आणि आज काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने काल मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला होता.
नैऋत्य मोसमी पावसाचा अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश केला आहे. या ठिकाणी पुढील २४ तास अतिवृष्टीची शक्यता आहे. मान्सून २७ मे रोजी केरळमध्ये तर ६ जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण असून पुढील 24 तासाच्या आत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने चांगला तडाखा दिला आहे. धाराशिव, भूम, तुळजापूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जवळपास तासभर झालेल्या या पावसाने शिवारात पाणीच पाणी केलं. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. धाराशिव शहरात रात्री उशिरा देखील पावसाच्या सरी बरसल्या. उमरगा तालुक्यात एका घोड्यासह चार जनावरे वीज पडून दगावली आहेत. हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.