पवार विरुद्ध पवार, ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना किती मतदार संघात लढती रंगणार

KolhapurLive

लोकसभा निवडणुकीत दोन टप्पे राज्यात पूर्ण झाले आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे. त्यात सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतींकडे लागले आहे. राष्ट्रवादीमधील लढतीत शरद पवार यांचा गट बाजी मारणार की अजित पवार यांचा गट वर्चस्व राखणार हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीमधील दोन गट केवळ दोन मतदार संघात समोरासमोर येत आहे. परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तब्बल १३ मतदार संघात समोरासमोर आहे. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोणाची ही बाब स्पष्ट होणार आहे. तसेच मुंबईतील तीन मतदार संघात दोन्ही गट समोर असल्यामुळे मुंबईत वर्चस्व कोणाचे हे समजणार आहे.

राष्ट्रवादीची दोन गटात समोरासमोर लढत
शरद पवार विरुद्ध अजित पवार या राष्ट्रवादीमधील दोन गटात दोन ठिकाणी लढती होत आहे. बारामती आणि शिरुर मतदार संघात राष्ट्रवादीमधील उमेदवार समोरासमोर आहेत. अजित पवार यांचा पक्ष घड्याळ चिन्ह घेऊन मैदानात आहे तर शरद पवार यांचा पक्ष तुतारी चिन्ह घेऊन रिंगणात आहे. परंतु शिंदेसेना आणि शरद पवार गट एकाही मतदार संघात समोरासमोर येत नाही.

उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना १३ मतदार संघात
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तब्बल १३ मतदार संघात समोरासमोर लढत आहेत. त्यात मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम हे मुंबईतील तीन मतदार संघ आहे. यामुळे मुंबई कोणाची याचा निर्णय या लोकसभेत लागणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मतदार संघात आणि कल्याणमध्ये दोन्ही सेना समोरासमोर आहे. हातकणंगले, मावळ, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली या मतदार संघात ठाकरे सेना आणि शिंदे सेना समोरा समोर आहे.

विशेष म्हणजे अजित पवार गट आणि काँग्रेस तसेच शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकाही मतदार संघात समोरासमोर नाही. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना २१ जागा लढवत आहे तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना १५ जागा लढवत आहेत. राज्यात मतदानाचा तिसरा टप्पा ७ मे रोजी होणार आहे.