दि. १७ व १८ नोव्हेंबर २०२३ या २ दिवशीय इज्तेमा (धार्मिक मेळावा) मार्केट यार्ड, गडहिंग्लज येथे संपन्न झाला. या दोन दिवसामध्ये ५ सत्रात नमाज, प्रवचन, जीक़ (ध्यान धारणा) किताब हदीस वाचन व इतर धार्मिक कार्य संपन्न झाली. या इज्तेमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, राधानगरी, चंदगड, आजरा व गडहिंग्लज असे ५ तालुक्यातील १५ हजार मुस्लिम बांधव आलेले होते.
आज दि. १८/११/२०२३ रोजी संध्याकाळी ५ वा. सामुदायिक विवाह (१० जोडपे) व त्यास अनुसरुन प्रवचन झाले. तर शेवटचे प्रवचन संध्याकाळी ६.१५ वा. होऊन इज्तेमाची सांगता सर्वांसाठी दुवा (प्रार्थना) करणेत आली. सर्व लोकांनी एक अल्लाहची भक्ती करणे, आपले जीवन प्रामाणिक, साधी राहणी व उच्च विचारांची म्हणजे प्रेषित मुहम्मद पैगंबराच्या सांगण्याप्रमाणे आपले दैनंदिन व्यवहार असावेत, जगात शांतता नांदावी, सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये बंधुभावाप्रमाणे राहणे, एकमेकांच्या सुख-दुखात, अडी-अडचणीत सहभागी होऊन सेवावृत्तीने सहकार्य करणे, प्राणीमात्रावर दया करणे, स्वकष्टाची कमाईच आपल्या जीवनाला स्थैर्य देते, दोन नंबरचा पैसा (काळा पैसा) म्हणजे हरामाचा पैसा वाईट मार्गाला नेतो त्यापासून लांब राहणे, आपापल्यातील दैनंदिन व्यवहार, धार्मिक सिध्दांतानुसार करणे व समाजाशी एकरूप होणे, आपले आचरण शुद्ध ठेवणे इ. विषयी सखोल माहिती देऊन जागृकता करणेत आली.
हवा मेळाव्यासाठी सर्व समाजाच्या लोकांनी सहकार्य हे या मेळाव्याचे वैशिष्ठ्य ठरले. मार्केट यार्ड कमिटी, नगरपालिका प्रशासन, पोलीस खाते, महालक्ष्मी यात्रा कमिटी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व पक्षातील नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते, समाजसेवक यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन समाधान व्यक्त केले.
या इज्तेमा ठिकाणी नमाजपूर्वी (हातपाय धुणे) वजू करणेसाठी ३०० नळ तर ५ स्नान गृहे, ५० मुतारी, १०० संडासगृहे, २०० X २०० मंडप, कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय यांचेकडून ४ बेडचा दवाखाना व अॅम्बुलन्स, चार चाकी व दुचाकी पार्किंग व्यवस्था, १,५०,००० लिटरची क्षमता असलेले शेततळे, गोकुळ तर्फे पाण्याचा टँकर, सुभाष हेब्बाळे व रहेमान नाईकवाडे यांचेकडून पाण्याची व्यवस्था तसेच स्थानीक गावकऱ्यांकडून पाण्याची टँकर देऊन सहकार्य केले. शाकाहारी भोजन फक्त ३०/- रु., खाद्य पदार्थांचे वेगवेगळे २० स्टॉल, चारचाकी व दुचाकीसाठी मेकॅनिकल स्टॉल व पथके होती. गडहिंग्लज शहरात मोक्याच्या ठिकाणी दिशा दर्शक व सुचना करणारे पथके, भरारी पथके यासाठी तब्बल ५०० समाजसेवक वीना मुल्य सेवा देत होते.