शिवराज महाविद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

KolhapurLive

गडहिंग्लजः शिवराज महाविद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व संचालक श्री बसवराज आजरी यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या भाषणातून दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेब यानी शिवाजी विद्यापीठाबरोबरच पहिल्या पाच महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामध्ये आपल्या शिवराज महाविद्यालयाचा समावेश आहे. त्यामुळे आदरणीय चव्हाण साहेबांच्या हस्ते आपल्या महाविद्यालयाच्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी दिलेल्या या बहुमोल योगदानामुळे हे महाविद्यालय खऱ्याअर्थी स्थापन झाले आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची सोय झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वर्गीय चव्हाण साहेब यांचे चरित्र वाचले पाहिजे व त्यातून प्रेरणा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष श्री जे. वाय. बारदेस्कर, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, डॉ. आनंदा कुंभार, रजिष्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.