शिवराज महाविद्यालयात इस्त्रोच्या चांद्रयान ३ या मोहिमेत मोलाचे योगदान दिल्याबद्दल उद्योजक श्री बसवराज आज़री यांचा सत्कार

KolhapurLive
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात विज्ञान मंडळ यांच्यावतीने आयोजित गडहिंग्लजचे सुपुत्र व सुप्रसिद्ध उद्योजक श्री बसवराज आजरी यांनी इस्त्रोच्या चांद्रयान या मोहिमेत हिट पाईपव्दारे दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किसनराव कुराडे होते तर संस्था उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ.ए.एम. हसुरे यांनी केले. अतिथींचा परिचय संचालक बसवराज आजरी यांनी करून दिला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक श्री बसवराज आजरी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व आपले अनुभव कथन करताना आपण स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात देशसेवेसाठी आपल्या परीने योगदान देता येईल या भावनेने शुगर इंडस्ट्रीमधील चाळीस वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन इखोला हिटपाईप व तंत्रज्ञान पुरवठा करण्याचे आव्हान स्वीकारून यशस्वी करून दाखविले याचाही सार्थ आभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले, असेच कार्य विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरमध्ये करावे असे प्रतिपादन केले. कोणतेही चांगले काम स्वच्छ मनाने केले तर जीवनात आपण यशस्वी होतो. त्यासाठी आपले कष्ट आणि प्रयत्न महत्वाचे आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न मोलाचे आहे. त्यातून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. माझ्या कार्यात शिवराजचे योगदान आहे. त्यामुळे शिवराजचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आमचे मार्गदर्शक प्रा. किसनराव कुराडे हे आम्हाला गुरु म्हणून लाभले. त्यांनी आम्हाला दिलेल्या मार्गदर्शनातून पडले असल्याचे सांगून त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणी सांगितल्या.

अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनीही अध्यक्षीय भाषणातून शिवराजचा पन्नास वर्षापूर्वीचा विद्यार्थी श्री बसवराज आजरी यांनी आपल्या कार्यात मोठ्या धाडसाने घेतलेली झेप ही कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा मला नेहमीच गुरु म्हणून अभिमान वाटतो. त्यांनी चांद्रयान मोहिमेत दिलेले योगदान हे मौलिक असे आहे. शिवराजच्या माध्यमातून आजपर्यंत देत असलेल्या योगदानाचे खऱ्याअर्थी फलित झाल्याचे समाधान प्रा. कुराडे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी उद्योजक श्री आजरी यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनीही उद्योजक आजरी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय किसान संघाचे बसवराज हंजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरव पाटील, डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले.