अजित पवार राजभवनावर दाखल, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण

KolhapurLive


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राजभवनाच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप घडणार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. त्यानंतर अजित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.


अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाब टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.