बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात आज देशभरातील विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आयोजित केली. या बैठकीला देशभरातील 15 विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची इनसाईड स्टोरी आमच्या हाती लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, या विचारावर सर्वांचं एकमत झालं.
पाटण्यातील बैठकीत सर्व विरोधी पक्षांचा आपण सर्व एक आहोत असा सूर बघायला मिळाला. या बैठकीत संयोजक पदाबाबत चर्चा झाली. तसेच पुढची बैठक ही जुलै महिन्यात ठरविण्यात आली. ही बैठक आता शिमल्यात होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे पुढची बैठक शिमल्यात ठरवण्यात आली. या बैठकीत संयोजक पदाबाबत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
‘आम्ही एकमेकांना शिव्या घालणारे एकत्र आलो’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीत आप आणि काँग्रेसला एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय नात्याचं उदाहरण दिलं. “महाराष्ट्रात 25 वर्ष एकमेकांना शिव्या घालणारे आम्ही एकत्र आलो. मागचं सगळं विसरुन आज आम्ही एकत्र काम करत आहोत”, असं शरद पवार आप आणि काँग्रेसला उद्देशून म्हणाले.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पाटण्याच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी देशाला हुकुमशाहीकडे नेत आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. भाजप गरजेप्रमाणे रंग बदलते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपसोबत लढायचं असेल तर जुने मतभेद विसरुन एकत्र या. जागावाटपात काँग्रेस समझौता करेल. देश वाचवण्यासाठी काँग्रेस बलिदान देण्यास तयार आहे. भाजपची नीती भारत तोडो आहे. भाजपच्या भारत तोडो नीतीला भारत जोडोनं विरोध करतोय”, असं राहुल गांधी म्हणाले.