तो तिच्यावर कोयत्याने वार करणार तेवढ्यात…”, पुण्यातील कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांनी सांगितला घटनाक्रम!

KolhapurLive

एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची निर्घृण हत्याप्रकरणातून महाराष्ट्र सावरत नाही तोवर पुण्यातूनच दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली. मात्र, यावेळी दोन तरुणांनी दाखवलेल्या प्रसांगवधान आणि समयसूचकतेमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट चौकीजवळ काल (२७ जून) शंतनू जाधव या तरुणाने एका मुलीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यादरम्यान तरुणी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण हल्लेखोर इतका संतापलेला होता की त्याने तिच्या हत्येचाच विडा उचलला होता. परंतु, एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी या पीडितेचा जीव वाचला आहे. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीचा प्रतिकार केला. यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं याविषयी त्यांनी माहिती दिली आहे.


मी सकाळी नऊ-साडेनऊ वाजता अभ्यासिकेत येत होतो. मी पायऱ्यांवरून वर चढायला जात होतो तेवढ्यात मला मोठा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर एका मुलीवर वार झाला होता. ती माझ्या दिशेनेच पळत आली. तो तिच्या मागून कोयता घेऊन धावतोय. ही सामाजिक विकृती आहे की तो कोयता घेऊन मागून पळतोय आणि पोरगी ओरडत वाचवा म्हणून पळतेय, तरी लोक बघत बसलेत. तिला वाचवायचं सोडून लोक आजूबाजूला सरकले. ती पळत पळत दुकानात गेली. ती दुकानात आत जाण्याचा प्रयत्न करत असताना दुकानवाल्याने शटर खाली खेचलं. त्यामुळे ती दुकानाच्या दारात बसली. तो खूप रागात होता, तो तिला मारणारच होता. त्यामुळे मी पळत गेलो. तो कोयत्याने तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी मागून त्याला पकडलं. तेवढ्यात हा (हर्षद पाटील) मदतीला आला. जे आधी बघत होते, तेच तिला वाचवायला आले. पण तीन-चार सेकंदात ती पोरगी वाचली”, अशी अंगावर काटा आणणारी हकिगत लेशपाल जवळगेने सांगितली. लेशपाल टीव्ही ९ मराठीसोबत बोलत होता.

दर्शना पवार ताईंची ताजी केस असताना समाज आपली जबाबदारी झटकतोय. हे पाहत असताना वाईट वाटतं”, असंही लेशपाल म्हणाला. “दिल्लीत झालेली केस माहित होती, व्हिडीओ पाहिला होता. व्हिडीओ पाहत असातनाही मी तेव्हा (व्हिडीओतील)आजूबाजूच्या लोकांना शिव्या देत होतो. तो मारतोय तुम्हाला दिसत नाहीय का? हाच प्रसंग माझ्यासमोर आला होता. मला काय झालं माहित नाही. मी पळत सुटलो. काय होईल ते होईल बिचारी पोरगी वाचेल. हे प्रकरण झाल्यानतंर मी खोलीवर गेलो. खोलीवर एक दीड तास खूप रडलो. आताही मला रडू येतंय. ती पोरगी मेली असती. पण एका सेकंदामुळे ती वाचली”, असंही लेशपालने सांगितलं.