बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समद्र उधाणला आहे. चक्रीवादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमही स्थापन केली आहे.
चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकत असताना रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून या स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे पुरेशा साठ्यासह उघडे राहतील याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेसही तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागांना बिपरजॉय वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या भागात पश्चिम रेल्वेचे भावनगर, राजकोट आणि अहमदाबाद हे विभाग येतात. वेरावळ- जुनागढ विभाग, पोरबंदर-कनालूस विभाग, राजकोट-ओखा विभाग हे भाग सर्वात संवेदनशील आहेत. मुंबई किनारपट्टी भागात बुधवारीही वाऱ्याचा वेग हा ताशी ४० ते ५० किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ जून रोजी कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, जुनागड आणि मोरबी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.