भडगाव सालाबादप्रमाणे भडगाव येथे परंपरागत पद्धतीने गावातील भाविकांनी यंदाही अत्यंत उत्साहात श्री गुड्डाईदेवीची यात्रा साजरी केली. पण यंदाच्या वर्षी प्रथमच पावसाचा एकही थेंब न होता यात्रा संपन्न झाली. त्यामुळे देवीला लवकर पाऊस पडू दे, असे साकडे घालण्यात आले.
वास्तविक पाहता गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाच्या हंगामात ही यात्रा संपन्न होते. लोक पेरणीची कामे आटोपून मोकळी झालेली असतात अशावेळी अत्यंत उत्साहात भाविक देवीच्या अभिषेकासाठी गावातून डोंगरावर पायी चढत पाण्याची घागर घेऊन जातात व यात्रा साजरी करतात. यंदाही परंपरागत पद्धतीने यात्रा संपन्न झाली खरी पण लोकांना पावसाची आस होती. त्यामुळे जून महिना संपत आला तरी पाऊस न झाल्याने भडगाव ग्रामस्थांसह भाविकांनी गुड्डाई देवीला चांगला पाऊस पडून प्रत्येकाच्या घरी धन-धान्य लाभू देत यासाठी साकडे घातले. यावेळी सकाळी पहाटेच्या दरम्यान देवीला अभिषेक घालून विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी मोठया संख्येने उपस्थित असणाऱ्या भाविकांनी सामुदायिक आरती केली. त्यांनंतर दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. सायंकाळी पालखी मिरवणूक झाल्यानंतर इनामदार लिंगोंडा देसाई यांच्या हस्ते सहपत्नीक देवीची आरती करून यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या यात्रेसाठी यात्रा समितीने विशेष परिश्रम घेतले