राज्यात एकीकडे सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. विरोधकांकडून सरकार अल्पकाळ टिकेल असे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहेत. सर्वच पक्षांनी त्या दिशेनं नियोजन करायला सुरुवात केली आहे. आघाडी-युतीची चर्चा सुरू झालेली असताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहेऱ्यांचीही चर्चा पाहायला मिळत आहे. यात भाजपा-शिंदे गट युतीच्या मुख्यमंत्रीपदावरून अनेक तर्क लावले जात आहेत.
एकीकडे भारतीय जनता पक्षानं पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे तर्कानुसार एकनाथ शिंदेच युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणं अपेक्षित आहे. मात्र, त्यासंदर्भात अद्याप युतीमध्ये स्पष्ट भूमिका ठरली नसल्याचंच चित्र देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे निर्माण झालं आहे. शिंदे गटासोबत भाजपानं युती करून स्थापन केलेलं सरकार आणि शिंदेंना दिलेलं मुख्यमंत्रीपद हा तात्कालिक निर्णय होता, अशी चर्चा रंगत आहे. त्यामुळे पुढील वर्षी युतीकडून ‘वेगळा निर्णय’ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे!
देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात केलेल्या विधानांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. याआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वगुणांविषयी ठाम भूमिका मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याबाबत पक्षातील वरीष्ठ निर्णय घेतील, अशी भूमिका मांडली.