महाराष्ट्रात घडलेल्या हत्येच्या घटना या काही महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत. महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य आहे. कोल्हापूर आणि नगरच्या घटना या महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाही. याची किंमत ही सामान्य माणसांना मोजावी लागते असं म्हणत शरद पवार यांनी कोल्हापूर आणि नगरच्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य केलं तर ही अवस्था तातडीने बंद झाल्याचं पाहण्यास मिळेल. कोल्हापूर असो किंवा अन्य शहरं असोत सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्या ठिकाणी शांतताच प्रस्थापित झाली पाहिजे. छत्रपती शाहू आणि महाराणी ताराराणी यांचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे. दोन-चार लोक चुकीचं वागत असतील पण प्रशासनाचं ऐकलं तर शांतता प्रस्थापित होईल. बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि शांतता प्रस्थापित केली पाहिजे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
६ जून ला ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. राज्यभरात या सोहळ्याचा उत्साह दिसून आला. त्याच दिवशी कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस फोनवर ठेवल्याने वाद उफाळून आला. त्याचे पडसाद कोल्हापुरात पाहण्यास मिळाले. त्याच दिवशी अहमदनगर या ठिकाणी निघालेल्या एका संदलमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन काही तरुण नाचत होते. या सगळ्या गोष्टींमुळे हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. हा मुद्दा चांगलाच चिघळला. त्यानंतर आता शरद पवार यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाच्या अवलादींना सोडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.