संजय राऊत यांनी उदयनराजे, शिवेंद्रराजे यांना सुनावले; म्हणाले, तुम्ही रस्त्यावर एकमेकांचे वाभाडे…

KolhapurLive

सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते होणारा एक कार्यक्रम उदयनराजे भोसले यांनी उधळून लावला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या वादावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राजांना चांगलेच फटकारले आहे. आम्ही जेव्हा तुमच्याविरोधात काही बोललं तर तो छत्रपतींच्या गादीचा अपमान होतो. मग तुम्ही रस्त्यावर उतरता तेव्हा गादीचा अपमान नसतो का?, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दोन्ही राजांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

आम्ही जेव्हा एखादी टीका टिप्पणी करतो तेव्हा तो गादीचा अपमान ठरतो. तुम्ही रस्त्यावर एकमेकांचे वाभाडे काढता तेव्हा तो गादीचा अपमान ठरत नाही का? तु्म्ही दोघेही छत्रपतींचे दोन वशंज, वारस आहात. आम्ही तुमच्याविषयी लोकशाही मार्गाने काही भाष्य केलं तर तो शिवरायांचा अपमान होतो, गादीचा अपमान होतो. हे तुम्हीच दोन राजे बोलत असता. पण तुम्ही दोन राजे साताऱ्याच्या रस्त्यावर येऊन भांडतात. तेव्हा आम्हालाही वाटते हा गादीचा अपमान होतो. दोन राजे ज्या पद्धतीने एकमेकांवर धावून जात आहेत… आता फक्त तलावारीच काढायचं बाकी आहे. हा गादीचा अपमान नाही का? आपण काय करत आहोत हे दोघांनी बसून ठरवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

शिवाजी महाराजांचे वशंज अजूनही छत्रपती ही उपाधी लावतात हे दुर्देव असल्याचं विधान प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केलं होतं. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. मी असं म्हणणार नाही. लोक प्रेमाने त्यांना छत्रपती म्हणतात. शिवाजी महाराजांच्या कुटुंबाविषयी लोकांच्या मनात सद्भावना आहे. जनता त्यांना छत्रपती संबोधत असेल तर चांगलं आहे.

पण ते स्वत:च लावत असतील तर त्यावर काही म्हणणं नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे दोन योद्धे जगात निर्माण झाले. त्यांनी मोगलशाही विरोधात तलवार उचलली. ते कधीही झुकले नाहीत. त्यांनी कधी लाचारी पत्करली नाही. आजच्या प्रमाणे आताच्या राज्यकर्त्यांच्या दारात लोकं वारसा विसरून उभं राहतात. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापप यांचा आदर्श आमच्यासमोर आहे, असं राऊत म्हणाले.