स्टॉइनिस आणि पूरनने लखनऊला दणदणीत विजय मिळवून दिला –
२१३ धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवातीला खराब फलंदाजी पाहायला मिळाली. संघाने पहिल्याच षटकात १ धावांवर काइल मेयर्सच्या (०) रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला दीपक हुडाही फार काळ टिकू शकला नाही आणि १० चेंडूत ९ धावा काढून तो वेन पारनेलचा बळी ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने काही काळ जबाबदारी सांभाळली आणि ३० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले.
चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ७६ धावांची भागीदारी –
कर्णधार केएल राहुल आणि मार्क स्टॉइनिस यांनी चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली. दोघेही क्रीझवर जास्त वेळ घालवू शकले नाहीत. ११व्या षटकात कर्ण शर्माने स्टोइनिसला तर १२व्या षटकात मोहम्मद सिराजने केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राहुल २० चेंडूत केवळ १८ धावा करून बाद झाला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरनने संघाला विजयाची आशा निर्माण करुन दिली.
पुरणने केवळ १९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ३२६.३२ होता. पूरन आणि आयुष बडोनी यांनी मिळून सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. सिराजने पुरणचा डाव संपुष्टात आणला. यानंतर १९व्या षटकात चांगली फलंदाजी करणाऱ्या आयुष बडोनीने आपली विकेट गमावली. बडोनी २४ चेंडूत ३० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मार्क वुड (१) आणि जयदेव उनाडकट (९) यांनी विकेट गमावल्या.लखनऊला शेवटच्या चेंडूवर एका धावाची गरज होती आणि ती लेगबायद्वारे मिळाली.
या सामन्यात आरसीबीकडून मिश्र गोलंदाजी पाहायला मिळाली. काही गोलंदाजांनी कमी धावा केल्या, तर काही गोलंदाज अधिक महागडे. मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २२ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय वेन पारनेलने 4 षटकांत ४१ धावा देत ३ बळी घेतले. दुसरीकडे कर्ण शर्माने ३ षटकांत ४८ धावा देत २ बळी घेतले. उर्वरित गोलंदाजांमध्ये हर्षल पटेलने ४ षटकांत ४८ धावा देत १ बळी घेतला.