भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली आणि २०१९ साली महाविकास आघाडीसारखा न भूतो न भविष्यती असा प्रयोग महाराष्ट्रात झाला. अडीच वर्षं हे सरकार सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. या राजकीय घडामोडींचे संदर्भ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने येत असतात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गुरुवारी त्याचेच पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी समोर बसलेल्या उद्धव ठाकरेंना सूचक सल्ला देतात सभागृहात एकच हशा पिकला!
“शरद पवारही झाड लावायला आले होते”
विधानपरिषदेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मागील सरकारच्या काळातील एका वृक्षारोपण योजनेविषयी बोलताना सांगितलं, “२०१६मध्ये या योजनेला सुरुवात केली, तेव्हा उद्घाटनाला राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते आले होते. उद्धव ठाकरेही आले. शरद पवार स्वत: झाड लावायला गेले”, असं मुनगंटीवार म्हणाले. तेवढ्यात समोर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी “पण झाडाला फळंच नाही आली त्या”, असा टोला लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर लागलीच मुनगंटीवारांनी सूचक टिप्पणी केली. “उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की झाडाला फळं येतील. पण तुम्ही झाडाशीच नातं तोडलं. आता त्याला काय करणार. मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणतं खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं. त्याच्यामुळे त्या झाडाला फळं कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती”, असं मुनगंटीवार म्हणाले.