कारकीर्दीत श्रीकांतवर दुसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या मिथुनने अंतिम लढतीत थॉमस चषक विजेत्या संघातील प्रियांशु राजावतविरुद्ध एकतर्फी वर्चस्व राखले. राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीकांतवर विजय मिळविल्यावर मिथुनने अंतिम लढतीत विजेतेपदाच्या निर्धारानेच खेळ केला. पहिल्या गेममध्ये आघाडीनंतर गेमच्या मध्याला एका गुणाने मागे पडल्यानंतरही उत्तरार्धात मिथुनने आक्रमक खेळ करताना प्रियांशुवर दडपण आणले आणि पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममधील मिथुनचे वर्चस्व लक्षणीय होते. मिथुनच्या वेगवान आणि आक्रमक फटक्यांना प्रियांशु उत्तर देऊ शकला नाही. दुसऱ्या गेमच्या मध्यात ११-८ अशा आघाडीनंतर मिथुनने उत्तरार्धात प्रियांशुला केवळ तीनच गुणांची कमाई करून दिली यावरूनच त्याच्या एकतर्फी वर्चस्वाची कल्पना येते.
महिला एकेरीत अनुपमाने १ तास १८ मिनिटांच्या कडव्या प्रतिकारानंतर सामना जिंकला. फटक्यांवर राखलेले अचूक नियंत्रण आणि फटक्यांची अचूक दिशा ही अनुपमाच्या खेळाची ताकद ठरली. या जोरावरच पहिली गेम गमावल्यानंतरही अनुपमाने विजेतेपद मिळवले. तिसऱ्या निर्णायक गेमला मात्र आकर्षिने अगदी अखेरच्या टप्प्यात आपला खेळ उंचावल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली होती. त्यामुळे ४-२, १०-६, ११-६, १५-१० अशा आघाडीनंतरही आकर्षिने सलग पाच गुण घेत पिछाडी भरून काढत १९व्या गुणाला बरोबरी साधून एकवेळ २०-१९ अशी आघाडी घेतली. मात्र, मॅचपॉइंट साधण्यात आकर्षिला अपयश आले. निर्णायक क्षणी सामना पुन्हा २०-२० असा बरोबरीत आला. यावेळी अनुपमाने संयमाने दोन गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मिश्र दुहेरीत हेमनागेंद्र बाबू आणि कनिका कन्वल या रेल्वेच्या जोडीने तेलंगणाच्या सिद्धार्थ एलान्गो आणि दिल्लीच्या खुशी गुप्ता जोडीचा
२१-१७, २१-१६ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. महिला दुहेरीत अव्वल मानांकित केरळची ट्रिसा जॉली आणि तेलंगणाच्या गायत्री गोपीचंद जोडीने दिल्लीच्या काव्या गुप्ता-दीपशिखा सिंगला संधीच मिळू दिली नाही. ट्रिसा-गायत्रीने २१-१०, २१-९ अशी अंतिम लढत सहज जिंकली. पुरुष दुहेरीत कर्नाटकच्या कुशल-प्रकाश राज जोडीने महाराष्ट्राच्या दीप रामभिया-अक्षन शेट्टी जोडीचे आव्हान ८-२१, २१-१९, २१-८ असे संपुष्टात आणले.