राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी चूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजस्थान विधानसभेत जुना अर्थसंकल्प वाचला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पाची जी प्रत सोपवण्यात आली होती त्यामध्ये काही पानं जुनीच होती. तसेच मुख्यमंत्री जुनंच भाषण वाचू लागले. ८ ते १० मिनिटं ते जुनाच अर्थसंकल्प वाचत होते. हा प्रकार विरोधी पक्षाच्या लक्षात आला आणि विरोधी पक्षातले आमदार जोरजोराने हसू लागले. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. परिणामी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, अशोक गहलोत यांनी या चुकीसाठी सभागृहाची क्षमा मागितली. परंतु विरोधी पक्षातील नेत्यांनी गोंधळ केला. राजस्थानच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करताना सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं. बजेट ब्रीफकेसमध्ये जुन्या अर्थसंकल्पाची पानं आल्याने याला अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे सरकारची निंदा होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो
विधानसभा तहकूब
विरोधी पक्षातील आमदारांनी गोंधळ सुरू केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी विधानसभा अर्ध्या तासासाठी स्थगित केली. राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करतेवेळी विधानसभा तहकूब करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचं मुख्य सचिवांना बोलावणं
अर्थसंकल्प सादर करतेवेळी झालेल्या इतक्या मोठ्या चुकीमुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत अधिकाऱ्यांवर नाराज आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिवांना बोलावणं पाठवलं. त्यानंतर काहीच वेळात मुख्य सचिव उषा शर्मा विधानसभेत दाखल झाल्या. असं सांगितलं जात आहे की, ब्रीफकेसमध्ये जुन्या अर्थसंकल्पाची पानं कशी आली याबद्दल मुख्यमंत्री मुख्य सचिवांना सवाल करतील.