ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत अटकेआधीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
“आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो,” असं आव्हाडांनी सांगितलं आहे.
“मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही,” असंही आव्हाड म्हणाले आहेत.
‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. याच प्रकरणामध्ये आव्हाड यांच्यासहीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवून घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.