उसदरासाठी ट्रॅक्टर पेटवल्याने आंदोलन चिघळण्याची चिन्हे!; साताऱ्यात रास्त उसदरासाठी खदखद

KolhapurLive

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभरासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय उसतोड बंद आंदोलनाची सुरुवात होत असतानाच बुधवारी रात्री उशिरा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर कराडजवळ पेटवून देण्यात आल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.

उसाला एफआरपी अधिक किमान साडेतीनशे रुपये उसदर जाहीर करावा. संपूर्ण एफआरपी पहिली उचल म्हणून तर उर्वरित साडेतीनशे रूपये त्यानंतर देण्यात यावे या आपल्या मागणीकडे राज्यकर्ते व साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्यासाठी “स्वाभिमानी’चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गुरुवारी (दि. १७) व उद्या शुक्रवारी (दि. १८) या दोन दिवसात राज्यभर उसतोड बंद ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. तर, कोणत्याही परिस्थितीत ऊस वाहतूक होऊ नये असा इशारा शेट्टींनी साखर कारखानदारांना व ऊस वाहतुकदारांना दिला होता. या आंदोलनाला बुधवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. तर, रात्री उशिराच्या सुमारास कराड तालुक्यातील इंदोली येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात ७ – ८नी लोकांनी पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली

ट्रॅक्टरचा काही भाग जळाला असून, या घटनेमुळे उसतोड व ऊसवाहतूक बंद आंदोलनाला जणू बळ मिळाले आहे. हा ऊस वनवासमाची (ता. कराड) येथून धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सकडे वाहतूक होत होता. या ट्रॅक्टरला आग लावल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो यादव यांना उंब्रज (ता. कराड) पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे