काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशींची माफी मागितली होती. त्यांना आंदमानमधील तुरुंगामध्ये कारावासासाठी पाठवण्यात आलं तेव्हापासून ते ब्रिटीशांना चिठ्ठ्या लिहून माफी मागत होते, असं विधान राहुल यांनी आपल्या भाषणामध्ये केल्याने भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधींनी आज दुपारीयासंदर्भातील पत्रकार परिषद घेत सावरकरांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीचाही संदर्भ देत आपलं म्हणणं प्रसारमाध्यमांसमोर मांडलं. मात्र राहुल यांच्या भूमिकेवरुन त्यांच्यावर टीका करताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी सूचक शब्दांमध्ये भारत जोडोचा उल्लेख करत इशारा दिला आहे.
राम कदम यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून या प्रकरणावर भाष्य करताना राहुल गांधींनी कधी इतिहास वाचला आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. “श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का? स्वातंत्रवीर सावरकरांचं बलिदान, त्याग, संघर्ष, त्यांना झालेल्या यातना याबद्दल तुम्ही कधी वाचलं आहे का?” असा प्रश्न राम कदम यांनी विचारला आहे. “केवळ ‘भारतजोडो’ यात्रेला देशाने नाकारलं. त्यामुळे बातम्यांमध्ये झळकण्यासाठी एका महान क्रांतीकाराबद्दल तुम्ही असे अपशब्द वापरणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राम कदम यांनी आदित्य ठाकरेंचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटालाही या विषयावरुन लक्ष्य केलं आहे. “सर्वात दुर्देवाची बाब ही आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीही कधी सावरकरांचा अपमान सहन केला नाही. त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे सावरकारांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेत आहेत. ही कशी विचारसरणी आहे?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
“भारत तेरे तुकडे होंगे बोलणाऱ्या नेत्यांबरोबर तुम्ही भारत जोडो यात्रा करत आहात. ही नाटकं बंद करा,” असंही राम कदम म्हणाले आहेत. व्हिडीओच्या शेवटी राम कदम यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी आणि काँग्रेसला इशारा दिला आहे. “येणाऱ्या काळात तुम्ही सावरकरांबद्दल अपमान करणाऱ्या शब्दांचा वापर केला आणि सावरकरांच्या भक्तांना चिथावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या यात्रेचं स्वागत आम्हाला वेगळ्या पद्धतीने करावं लागेल,” असं राम कदम म्हणाले आहेत.