अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, यावेळी त्या काहीशा भावूक झाल्याचे दिसून आले.
ऋतुजा लटके म्हणाल्या, “सर्वप्रथम मी म्हणेण हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जी जनसेवा केली, विकासकामे केली. त्याची पोचपावती ही विजयाने मिळालेली आहे. मतदारांनी त्याची एक परतफेड ही केलेली आहे.”
तर या निवडणुकीत नोटांचा जास्त प्रचार झाल्याच्या मुद्य्यावर बोलताना ऋतुजा लटके म्हणाल्या, “नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी(भाजपाने) जरी उमेदवारी मागे घतेली होती, तरी लोकांना सांगण्यात आलं आणि आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या आहेत की तुम्ही नोटाला मतदान करा. नोटाचा असा प्रचार होत नसतो नोटा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही, तेव्हा तुम्ही नोटाचं बटण दाबू शकता. त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्नमतदारांना विचारला पाहिजे की, त्यांनी नोटावर का मतदान केलं?”
भविष्यात कुठल्या कामांना प्राधान्य असणार? यावर उत्तर देताना ऋतुजा लटके म्हणाल्या, “पहिलं माझं हेच असणार आहे की, रमेश लटके यांची जी कामे अर्धवट राहिली आहेत, ती कामे पूर्ण करण्यास माझी प्राथमिकता असणार आहे. याशिवाय त्यांचा जो अंधेरीचा जास्तीत जास्त विकासाचा ध्यास होता, त्यानुसार काम करणार आहे. मी सर्व जनतेचे आभार मानते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातयाशिवाय या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी घेणारे अनिल परब या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.”